
कोयना जलाशयातून १०५ गावांचा जलविकास; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यात विविध निर्णय
22 एप्रिल कास :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळगावी दरे येथे श्री उत्तेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त दाखल झाले होते. आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी केवळ धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला नाही, तर जिल्ह्यातील विकासकामांचा देखील बारकाईने आढावा घेतला.
मुंबईहून थेट हेलिकॉप्टरने आलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. जननीदेवीच्या पूजेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या शिंदे यांची भेट खासदार आनंदराव अडसूळ आणि वनमंत्री संजय राठोड यांनी घेतली.
या दौऱ्यात त्यांनी महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशय परिसरातील बुडीत बंधाऱ्यांची पाहणी केली. यामध्ये यापूर्वी मंजूर झालेल्या योजनांचे पुनरावलोकन, सुरू असलेल्या कामांची तपासणी आणि नवीन बंधाऱ्यांसाठी आवश्यक ठिकाणांची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
कोयना जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये पाण्याची पातळी कमी झालेल्या ठिकाणी गाळ काढण्याचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. यावर्षी देखील हे काम सुरू राहावे, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक समीर शेख आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासोबत यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
महाबळेश्वरमध्ये २ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या ‘महापर्यटन महोत्सवा’बाबतही शिंदे यांनी माहिती घेतली आणि तयारीबाबत चर्चा केली.
याच दौऱ्यात एक महत्वाची घोषणा झाली. कोयना जलाशयाच्या परिसरातील १०५ गावांमधील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलविकास योजना मंजूर करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरी बंधारे, उपसा सिंचन योजना, सिमेंट साखळी बंधारे अशा विविध योजनांचा समावेश आहे. या कामांमुळे गावांमध्ये शाश्वत जलसंपत्तीचा विकास होणार आहे.
अधिक बातम्यांसाठी मराठा प्रेसचे सदस्य बना