
मुंबईत ३४ वर्षांनंतर रेल्वे टर्मिनसचे नूतनीकरण होणार , मेट्रो आणि एक्स्प्रेस हायवेची सुविधा जवळच उपलब्ध
16 एप्रिल मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक नवीन टर्मिनस तयार केले जात आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे. तीन दशकांपासून प्रलंबित असलेला मुंबईतील चौथा टर्मिनस लवकरच कार्यरत होणार आहे. हा नवीन जोगेश्वरी टर्मिनस अंतिम टप्प्यात आहे. यामुळे वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसवरील ताण कमी होईल. १९९१ मध्ये कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस उभारण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत किंवा उपनगरांमध्ये कोणताही टर्मिनस उभारण्यात आलेला नव्हता. कुर्ला टर्मिनस उभारल्यानंतर दादर व पनवेल येथे मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी सुधारणा करण्यात आल्या होत्या, मात्र नविन टर्मिनस नाही बांधण्यात आले. जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान होणारा हा नवीन टर्मिनस असेल. येथे कॅब, रिक्षा व अन्य वाहनांसाठी पार्किंग सुविधा असेल. या टर्मिनसवर तीन प्लॅटफॉर्म असणार आहेत. त्यापैकी एक आयलँड प्लॅटफॉर्म आणि एक होम प्लॅटफॉर्म असून, दोन्हीची लांबी ६०० मीटर असणार आहे. यातील दुसरा व तिसरा प्लॅटफॉर्म पहिल्या टप्प्यात सुरू होईल तर पहिला प्लॅटफॉर्म नंतर कार्यान्वित होणार आहे.
४ एसी व ४ नॉन-एसी डबल-बेड रिटायरिंग रूम्स, मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या असून, यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत, मुंबईतील एकूण ३६ स्थानकांचे पुनरुत्थान करण्यात येत आहे. यामुळे लोकल प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होईल. या प्रकल्पासाठी १,८१० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. रेल्वे स्थानके अधिक सुलभ, सुरक्षित व पर्यावरणस्नेही करण्यासाठी विविध वैशिष्ट्यांसह डिझाइन करण्यात आली आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश फक्त सौंदर्यीकरण नसून प्रवाशांचा संपूर्ण प्रवास अनुभव सुधारण्यासाठी आहे. सुविधा व जागा वाढवून, गर्दी कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. स्थानकांवर आधुनिक साइनबोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेश व निर्गमन सुधारणा तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सोय यांचा समावेश असेल. याशिवाय, पर्यावरणपूरक उपाययोजना जसे की ऊर्जा बचत करणारी प्रकाशव्यवस्था आणि पाण्याची बचत करणारे घटक यांचा देखील समावेश असेल.
परळ, माटुंगा, शहाड आणि घाटकोपर ही स्थानके लवकरच नव्याने रूपांतरित होणार आहेत. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार ३६ पैकी ५ स्थानकांवर ४० टक्के काम पूर्ण झाले आहे व लवकरच पूर्णत्वास येईल. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रगती थोडी मंद आहे, जिथे २५ ते ४० टक्के काम पूर्ण झाले आहे, त्यात मरिन लाईन्स व जोगेश्वरी स्थानकांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याच्या मते, असुविधा कमी करून जलद प्रगती करण्याचे आम्ही वचनबद्ध आहोत आणि लवकरच सर्व प्रवाशांना स्वच्छ आणि उत्तम प्रवास अनुभव मिळेल. देशातील एकूण १३२ स्थानकांचे काम आधीच पूर्ण झाले आहे.
अधिक बातम्यांसाठी मराठा प्रेसचे सदस्य व्हा