
पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संताप, राज ठाकरेंनी केंद्राला दिला कठोर इशारा
जम्मू-कश्मीर २३ एप्रिल : पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत केंद्र सरकारला ठाम भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं, “हल्लेखोरांवर अशी कारवाई व्हावी की त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही दहशतवाद करायचा विचार करु नये.”
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे म्हणाले, “ही अतिशय गंभीर घटना आहे. मृत्युमुखी पडलेल्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून श्रद्धांजली. सरकार या परिस्थितीत एकटे नाही, मनसे त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे.”राज ठाकरे यांनी इस्रायलचा दाखला देत सांगितलं, “१९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकमध्ये पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इस्रायली खेळाडूंवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायल सरकारने जे पाऊल उचललं, ते इतकं प्रभावी होतं की त्याचा परिणाम अनेक वर्ष दिसून आला. भारतानेही असंच कठोर उत्तर द्यायला हवं.”
तसेच, त्यांनी कलम ३७० हटवल्यानंतर निर्माण झालेल्या शांततेचा उल्लेख करत म्हटलं, “काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारत असतानाच असा हल्ला होणं चिंताजनक आहे. यामुळे तिथे गुंतवणूक, पर्यटन यावरही परिणाम होईल. केंद्र सरकारने कठोर पावलं उचलून पुन्हा विश्वास निर्माण करावा.”
आपल्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा हिंदू एकतेवर भर दिला. “जर आमच्या हिंदूंवर कोणी हात टाकेल, तर आम्ही सगळे हिंदू एकत्र येऊन उत्तर देऊ,” असं स्पष्ट करत त्यांनी सरकारच्या कठोर भूमिकेला पाठिंबा दर्शवला.
राज ठाकरे यांनी शेवटी म्हटलं, “सरकारने ठोस निर्णय घ्यावा. मनसे सरकारच्या पाठीशी ठाम उभी राहील. हल्लेखोरांना कायमचा धडा शिकवणं हेच आता योग्य उत्तर आहे.”
अधिक बातम्यांसाठी मराठा प्रेसचे सदस्य व्हा