
अंधेरीतील अपोलो इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
9 मे मुंबई : अंधेरी पूर्व येथील अपोलो इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका गाळ्यात गुरुवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. ही आग सकाळी ५:५६ वाजता लागली आणि ती सकाळी ८:५० वाजेपर्यंत नियंत्रणात आणण्यात आली. सुदैवाने या आगीत अंधेरीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अंधेरीतील अपोलो इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गाळा क्रमांक ४४, होली फॅमिली स्कूलच्या जवळपास, येथे ही घटना घडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ही आग ग्राउंड आणि पहिल्या मजल्याच्या भागापुरती मर्यादित राहिली होती.
आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, फर्निचर, शस्त्रक्रियेची उपकरणे, व्हीलचेअर्स, झेरॉक्स मशीन, संगणक आणि प्रिंटर्स यांसह कार्यालयीन साठ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई अग्निशमन दलाने आग पूर्णपणे आटोक्यात आणली असून, आग लागण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पिछल्या दोन आठवड्यांभरातली मुंबईतील आठवी आग लागण्याची घटना असताना, शहरातील आगीच्या वाढत्या घटनांमुळेच नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वर्तमानात चालू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे वीज वापर वाढण्याने, व एसीवरील भार वाढण्याने अशा घटना वाढत असल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे.
मुंबईत आग प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी होण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
अधिक बातम्यांसाठी मराठा प्रेसचे सदस्य व्हा.