
अंमलबजावणी संचालनालय ईडीची मोठी कारवाई: सहारा समूहाची 707 एकर अॅम्बी व्हॅली जमीन जप्त
16 अप्रेल अॅम्बी व्हॅली: सहारा समूहाने मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत लाखो लोकांकडून पैसे जमा करून घेतले. गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांना व्याज किंवा मूळ रक्कम परत दिली गेली नाही, असे अनेक तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले. अनेक गुंतवणूकदारांना पुन्हा गुंतवणुकीस भाग पाडले गेले. जुन्या योजनेतील पैसे मिळाल्याचे दाखवण्यासाठी खाती फेरफार करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात ती रक्कम दुसऱ्या नव्या योजनेत वळवण्यात आली होती. कोणतीही माहिती न देता जमा रकमेचा गैरवापर करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सहारा समूहाविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत कारवाई केली. ओडिशा, बिहार आणि राजस्थान येथील पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. मेसर्स हुमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि इतरांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि १२० ब (षड्यंत्र) अंतर्गत गुन्हे दाखल झाले. त्यानंतर सहारा समूहाशी संबंधित कंपन्या व व्यक्तींवर ५०० हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले, यापैकी ३०० प्रकरणांमध्ये पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या तपासादरम्यान, लोणावळ्यातील अॅम्बी व्हॅली सिटीमधील ७०७ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. या जमिनीची अंदाजे बाजारभाव किंमत सुमारे १४६० कोटी रुपये आहे. ही जमीन सहारा समूहाच्या विविध कंपन्यांनी बेनामी नावाने खरेदी केल्याचे उघड झाले असून, तिची नोंदणी बनावट नावांवर करण्यात आली होती. गुंतवणूकदारांकडून जमा केलेल्या पैशांचा वापर करून ही महागडी मालमत्ता खरेदी करण्यात आली होती, असे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
अजून माहितीसाठी मराठा प्रेस बना