
अंबरनाथमध्ये बुलेटच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, महिला गंभीर जखमी; १९ वर्षीय चालकाविरोधात गुन्हा दाखल
15 मे, ठाणे: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पश्चिमेतील के. व्ही. रोडवर मंगळवारी रात्री एक दुर्दैवी अपघात घडला. रवि खटवानी आणि भाग्यश्री औंधकर हे दोघे
कल्याणकडे जात असताना, अंबरनाथहून भरधाव वेगाने येणाऱ्या १९ वर्षीय नवीन थवानी याच्या बुलेट दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रवि खटवानी यांचा जागीच मृत्यू झाला, तर भाग्यश्री औंधकर गंभीर जखमी झाल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, रवि आणि भाग्यश्री हे दोघे डी मार्टमधून खरेदी करून बाहेर पडले होते. बदलापूर-कल्याण रोड ओलांडून ते घरी परतत असताना, नवीन थवानी याच्या बुलेटने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही रस्त्यावर फेकले गेले. रवि खटवानी यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी रवि खटवानी यांना मृत घोषित केले, तर भाग्यश्री औंधकर आणि नवीन थवानी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी नवीन थवानी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पुढील तपास सुरू आहे.
अधिक बातम्यांसाठी मराठा प्रेस चे सदस्य बना