
वांद्र्यातील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये क्रोमा शोरूमला आग; अग्निशमन दलावर आरोप
वांद्रे, ३० एप्रिल २०२५
वांद्रे येथील प्रसिद्ध लिंकिंग रोडवर असलेल्या लिंक स्क्वेअर मॉलमध्ये आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची गंभीर घटना घडली. या मॉलच्या बेसमेंटमधील ‘क्रोमा’ शोरूममध्ये ही आग लागली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच तिचा फैलाव वरच्या मजल्यांवर झाला. लिंक स्क्वेअर मॉल ही चार मजली इमारत असल्यामुळे आग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट दिसून येत होते, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली.
सदर आग पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लागली असून, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्याचे काम तात्काळ सुरू केले. मात्र आग मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे तिला नियंत्रणात आणणे कठीण झाले. अग्निशमन दलाचे जवान अजूनही शर्थीने आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र क्रोमा शोरूमसह इतर दुकानांचेही मोठे नुकसान झाल्याचे समजते. काही दुकानांचे कोट्यवधी रुपयांचे मालमत्ता नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत सांगितले की, ते आणि अनेक सामान्य नागरिक पहाटे 4 वाजल्यापासूनच घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी अग्निशमन दलाला आग पहिल्याच टप्प्यात रोखण्यासाठी पाणी आणि योग्य उपकरणं आणण्याची विनंती केली होती, पण दलाकडे ना पुरेशी साधनं होती, ना ती वापरण्याचे ज्ञान. सिद्दीकी यांनी सांगितले की, बेसमेंटमध्ये एक छोटी ठिणगी पडली होती आणि आग त्यातूनच वाढली. त्यांनी अग्निशमन अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले की वरच्या मजल्यांवर रेस्टॉरंट असून गॅस सिलिंडर ठेवलेले आहेत, जे फार मोठा धोका निर्माण करू शकतात. मात्र त्यांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आग आटोक्यात न येता ती अधिक भडकली आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
घटनेची गंभीरता लक्षात घेता, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या मॉलच्या आत कोणतीही व्यक्ती अडकलेली नाही, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार ही आग इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असे बोलले जात आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी तपास सुरू केला असून अधिकृत अहवालाची प्रतिक्षा आहे.