भाऊ

पुणे : हॉर्नच्या वादातून भाऊ-बहिणीवर हल्ला, तिघे जखमी

Spread the love

पुणे, २७ एप्रिल

पुणे : हॉर्न वाजविल्याच्या वादातून टोळक्याने भाऊ-बहिणीला बेदम मारहाण केल्याची घटना भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरात घडली. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत तिघे जण जखमी झाले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टोळक्याने केलेल्या मारहाणीत करण ललित केसवाणी (वय २८), भाऊ हर्ष आणि बहीण निकिता हे जखमी झाले आहेत. टोळक्याने करण यांचे आजोबा भारत यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. याप्रकरणी शोएब उमर सय्यद (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्यासह पाच ते सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण यांचा भाऊ हर्ष शनिवारी (२७ एप्रिल) भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरातून निघाला होता. त्या वेळी मोटारीचा हॉर्न वाद झाला. केसवाणी कुटुंबीय हे गुरुनानकनगर परिसराती जीवनज्योती सोसायटीत राहायला आहेत.

आरोपींनी सोसायटीसमोर हर्ष यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत त्यांचे कपडे फाटले. मारहाणीचा प्रकार सुरू असताना आरडाओरडा ऐकून करण, त्यांची बहिण निकिता, आजोबा भारत हे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर आले. हर्ष यांना मारहाण का केली ? अशी विचारणा आरोपींकडे करण यांनी केली. तेव्हा आरोपी शोएब आणि साथीदारांनी करण, बहिण निकिता, आजोबा भारत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना धक्काबुक्की केली. आम्ही या भागातील दादा आहोत, अशी धमकी दिली. त्यानंतर शोएबने करण यांना शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात दगड घातला.

डोक्यात दगड घातल्याने करण गंभीर जखमी झाले. टोळक्याने हर्ष यांना मारहाण करणे सुरू ठेवले. तेव्हा करण आणि निकिता यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांना दगड फेकून मारले. आरोपींनी सोसायटीच्या समोरील रस्त्यावर दहशत माजविली. करण यांचे आजोबा भारत यांना शिवीगाळ करुन आरोपींनी घर जाळून टाकण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

दोन वर्षांपूर्वी हडपसर भागात टोळक्याने मोटारचालक तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना हडपसर भागात घडली होती. पाषाण-सूस रस्त्यावर खड्ड्यात साचलेले पाणी उडाल्याने जाब विचारणाऱ्या दुचाकीस्वार तरुणीला मोटारचालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन दुचाकीस्वार तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती.

About The Author

You cannot copy content of this page

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com