
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण : आरोपी मनीषा मानेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
28 एप्रिल सोलापूर :सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी मनीषा मुसळे-माने हिला सोलापूर सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा माने-मुसळे हिला अटक झाल्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलमध्ये प्रशासन अधिकारी असलेल्या मनीषा माने-मुसळे हिची कौटुंबिक पार्श्वभूमी अन् राहणीमानाबद्दल शहरात चर्चा सुरू आहे. मनीषा डॉ. वळसंगकरांच्या रुग्णालयात कामाला लागली अन् काही दिवसांतच घरची मेंबर झाली. मग बघता बघता ती एकदम वरिष्ठ अधिकारीही झाली, असे सांगण्यात येत आहे.
डॉ. वळसंगकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये ए. ओ. माने-मुसळे हिच्यामुळेच आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्यानंतर तशी फिर्याद डॉक्टरांचे चिरंजीव डॉ. अश्विन यांनी दिल्या. पोलिसांनी तिला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. मनाने स्थिर अन् कुशाग्र बुद्धीच्या डॉक्टरांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले असेल? याबद्दल चर्चा सुरू असतानाच हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने-मुसळे हिच्या अटकेची बातमी आली. त्यानंतर तिला ओळखणाऱ्या मंडळींनी मनीषाबद्दल सांगायला सुरुवात केली.
तपास अधिकाऱ्यांनी पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात सादर करताना पुन्हा कोठडीची मागणी करण्याचा हक्क राखून ठेवत तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती केली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून निर्णय दिला.
हॉस्पिटल कर्मचाऱ्यांकडून मनीषा मानेवर आरोप
डॉ. वळसंगकरच्या आत्महत्येनंतर हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी मनीषा माने यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या अनुषंगाने सोलापूर पोलिस तपासाला वेग आला आहे. फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर, डॉ. शोनाली वळसंगकर यांच्यासह इतर संबंधित व्यक्तींचे आणि हॉस्पिटलमधील इतर कर्मचार्यांचे व आणखी काहींचे जबाबही नोंदवले जात आहेत. पोलिसांनी विश्वास व्यक्त केला आहे की संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरच आत्महत्येच्या मूळ कारणाचा उलगडा केला जाईल.
डॉ. वळसंगकर : एक तेजस्वी जीवनाचा करुण अंत
६९ वर्षीय डॉ. शिरीष वळसंगकर हे देशातील अग्रगण्य मेंदूविकार तज्ञांपैकी एक मानले जात होते. त्यांनी सोलापुरात ‘एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस’ या अत्याधुनिक रुग्णालयाची स्थापना केली होती. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील हजारो रुग्णांसाठी हे हॉस्पिटल आशेचा किरण ठरलं होतं.
त्यांचे शिक्षण सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात झाले होते, तर वैद्यकीय शिक्षण डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेजमधून पूर्ण झालं. पुढे लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एम.आर.सी.पी. (यूके) पदवी प्राप्त केली.
१८ एप्रिलचा काळाकुट्ट दिवस
१८ एप्रिलच्या रात्री डॉ. वळसंगकर रुग्ण तपासून घरी परतले. काही वेळातच त्यांच्या बेडरूमच्या बाथरूममधून गोळीबाराचा आवाज आला. दोन फायर झाले आणि कुटुंबीय बेधाव पळत आले. दरवाजा उघडल्यावर ते रक्ताच्या थारोळ्यात सापडले.
डॉ. अश्विन वळसंगकर आणि डॉ. शोनाली व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण डॉक्टरांनी जवळपास ७५ मिनिटं प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आलं नाही. रात्री १०.२० वाजता डॉ. शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आलं.
पोलिस तपास वेगात सुरू
सध्या पोलिस तपास सर्व बाजूंनी जोरात सुरू आहे. मनीषा मानेच्या भूमिकेचा तपशीलवार अभ्यास केला जात आहे. सर्व कागदपत्रं, ई-मेल, फोन रेकॉर्ड्स तपासले जात आहेत. तपास यंत्रणा लवकरच सत्य समोर आणेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.