
लातूर विमानतळाच्या विकासाला वेग, मुख्यमंत्री फडणवीसाचे निर्देश
एप्रिल २६, २०२५ । लातूर
लातूर जिल्ह्याचा सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर विकास व विस्तार होत आहे. त्यामुळे लातूर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे विमानतळाचा तातडीने विकास करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. २५) दिले. या विमानतळाचा लातूरसह बीड, धाराशिव या जिल्ह्यातील नागरिकांना लाभ होईल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची ९१ वी बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहातून झाली. यावेळी फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
लातूर विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) नुकतेच पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आहे. हे विमानतळ २००९ मध्ये रिलायन्स कंपनीने स्थापन केलेल्या लातूर एअरपोर्ट प्रा.लि. या कंपनीला ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. मात्र, अटी व शर्तीचा भंग केल्याने याबाबतचा करार संपुष्टात आणून प्रशासनाने हे विमानतळ ताब्यात घेण्याची कार्यवाही केली. या पार्श्वभूमीवर हे विमानतळ लवकरच सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यातच मुंबईत झालेल्या आजच्या बैठकीमुळे विमानतळाला चालना मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लातूर येथील हवाई धावपट्टी ११ मे २००० रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केली गेली होती त्यानंतर धावपट्टीचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि विस्तारापनानंतर ३ नोव्हेंबर २००९ ला हे विमानतळ मे. लातूर एअरपोर्ट प्रा. लि. यांना भाडेकरारावर दिले गेले होते.
जवळपास वर्षभर विमानसेवा सुरू राहिली. त्यानंतर ती बंद पडली. गेली १५ वर्षे या विमानतळाचा वापर केवळ राजकीय नेत्यांसाठी होत आहे. त्यामुळे विमानतळावर ‘व्हीआयपींचे विमानतळ’ असा शिक्का बसला होता. पण, आता हे विमानतळ सामान्यांसाठी सुरू होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल, अशी आशा निर्माण झाली.