
टायगर श्रॉफला मारण्यासाठी २ लाख व हत्यार? पोलिसांना मिळालेल्या फोनमुळे खळबळ!
२३ एप्रिल मुंबई :अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी दोन लाख रुपये आणि हत्यार दिल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी एका फोन कॉलद्वारे मिळाल्याने खळबळ उडाली. या कॉलमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. या प्रकरणात मनिष कुमार सुजिंदर सिंह नावाच्या ३५ वर्षीय व्यक्तीचे नाव पुढे आले असून, त्याने पंजाबमधून हा फोन केल्याचं तपासात उघड झालं आहे.
आरोपीने ‘ट्रीग’ नावाच्या सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टायगर श्रॉफला मारण्याचा कट रचल्याची खोटी माहिती दिली होती. प्राथमिक तपासणीत ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट झाल्यावर खार पोलिसांनी मनिषविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५३(२), २१२ आणि २१७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात अश्या प्रकारचे शंभरहून अधिक खोटे फोन किंवा संदेश मुंबई पोलिसांना मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक कॉलची सत्यता तपासावी लागते आणि यंत्रणेला सतत सजग राहावे लागते. अनेक वेळा या कॉल मागे वैयक्तिक वाद, अनुराग किंवा लोकांनी केलेले मिसकॉल असतात.
पोलिसांनी सांगितले की, अशा खोट्या माहितीमुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण येतो, आणि सुरक्षेच्या कामात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष कायदा आवश्यक आहे, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी लिखित केले आहे.
अधिक बातम्यांसाठी मराठा प्रेसचे सदस्य व्हा.