
”टोलनाक्यांचा काळ आता संपणार “, नवीन तंत्रज्ञानावर आधारित टोल प्रणाली आणण्याचा विचार ; नितीन गडकरी यांची माहिती
15 एप्रिल मुंबई: देशभरातील टोलनाक्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लवकरच पूर्णविराम लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकार सध्या अशी नवी टोल प्रणाली घेऊन येण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये पारंपरिक टोलनाकेच राहणार नाहीत.
गडकरी यांनी स्पष्ट केले की, जरी फास्ट टॅग प्रणालीने टोलनाक्यांवरील गाड्यांच्या रांगा कमी झाल्या असल्या, तरी अजूनही वाहनचालकांना काही वेळ उभे रहावे लागते. त्यामुळेच आता अधिक आधुनिक आणि सोपी व्यवस्था आणण्यावर भर दिला जात आहे.
मुंबईतील दादर येथील अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत बोलताना गडकरी म्हणाले, “१५ दिवसांत अशी नवीन टोल धोरण जाहीर होईल, ज्यामुळे टोलसंदर्भातील तक्रारी उरणारच नाहीत. मी महाराष्ट्रातील नव्हे, तर राष्ट्रीय महामार्गांच्या संदर्भात बोलतोय.”नवीन प्रणालीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं, “आम्ही सॅटेलाईट तंत्रज्ञानावर आधारित टोलिंग सिस्टिम विकसित करत आहोत. यामुळे देशभरातील टोलनाके बंद होतील. कोणतीही गाडी थांबवली जाणार नाही. कॅमेऱ्याद्वारे नंबर प्लेट स्कॅन करून जिथून वाहन प्रवास सुरू होईल, तेथून जिथे तो संपेल तिथपर्यंतचा टोल थेट बँक खात्यातून वसूल केला जाईल.”
याच वेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचाही उल्लेख केला. विनोदी शैलीत ते म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता १०० टक्के पूर्ण होणार. हा रस्ता बराच रेंगाळला. दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट्स आहेत. त्याच्या अडचणी खूप आहेत. कोकणातील सत्य सांगितलं तर तुम्हाला चालणार नाही. पण १४ ते १५ जण ३ एकर शेतीचे मालक. त्यांच्यात भावा-भावांमध्ये भांडणे झाली. कोर्ट केसेस झाल्या. त्या जमिनीच्या मोबदला देता देता पुरेवाट लागली. पण समस्या सुटली आहे.
समाचार अपडेट के लिए मराठा प्रेस पढ़ते रहें